शरद पवारांना धक्का; नातू पार्थ पवार पिछाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पार्थ पवार हे तब्बल १,३२,३८५ मतांनी मागे पडले आहेत.

मावळमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना कडवी लढत दिली होती. मुलाच्या विजयासाठी अजित पवार हे मावळमध्ये ठाण मांडून बसले होते. शेतकरी कामगार पक्षानंही राष्ट्रवादीला मदतीचा हात दिला होता. मात्र, या कशाचाही फायदा राष्ट्रवादीला झाल्याचं दिसत नाही.

मावळमध्ये आतापर्यंत एकूण ४ लाख ५८ हजार मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी श्रीरंग बारणे यांना ४,०६,७४९ तर, पार्थ पवार यांना २,७४,३६४ मते मिळाली आहेत.

सतराव्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तामिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी ‘विजेता कोण?’ हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *