छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ( सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बफरला हार्बर मार्गावरील लोकल धडकल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (शुक्रवार) ११.३० च्या सुमाराला घडली. सुदैवाने लोकलचा वेग धीमा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने बसलेल्या झटक्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. सुदैवाना सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
आज दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. बोलापूरहून लोकल बफरला धडकल्यानंतर बसलेल्या झटक्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. धडकेमुळे लोकलच्या डब्याचे अलाइनमेंटबी अस्तव्यस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वाहतूक पूर्वपदावर
दरम्यान, बेलापूर लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बफरला धडकल्यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या. धडकलेली लोकल तातडीने मागे घेत मार्ग मोकळा करण्यात आला. त्या नंतर काही काळ बंद पडलेली हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक काहीशी उशिराने धावत आहेत.
ही किरकोळ घटना: रेल्वे प्रशासन
दरम्यान, लोकल धडकू नये किंवा कोणताही गंभीर स्वरूपाचा अपघात होऊ नये याचसाठी प्लॅटफॉरर्मच्या सुरुवातीला बफर लावलेले असतात. बेलापूरहून आलेली ही लोकल धडकली तेव्हा अतिशय धीम्या गतीत होती. या मुळे काहीही नुकसान झालेले नाही. प्रवासीही सुखरुप आहेत. धडकलेली लोकल चांगल्या स्थितीत असून ती फेरीसाठी रवाना देखील झाली, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी माहिती दिली.