‘संग्राम येथे पडणार आहेत फिके… निवडून येणार सुजय विखे… आम्हाला नकोत तुमचे स्वप्नफुलांचे बुके… आम्हाला हवेत फक्त सुजय विखे’… अशा चारोळ्यांची मनसोक्त पखरण करणारे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे जोरदार हशा उसळवला. भाषणादरम्यान विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सांत्वनही केले. ‘तुम्हाला काहीतरी मिळेल, तेव्हा सर्वांना सारे कळेल,’ अशी कोटीही त्यांनी केली. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता, ‘वंचित आघाडी आमच्यासाठी किंचित आघाडी आहे,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
डॉ. विखे व सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेस आठवले उपस्थित होते. या वेळी भाषण करताना राजकीय चारोळ्या सादर करून त्यांनी धमाल उडवून दिली. ‘मी येथे आलो आहे विखे व लोखंडेंना निवडून देण्यासाठी, मुंबईला जात आहे दोन्ही काँग्रेसचा बदला घेण्यासाठी,’ ‘मी येथे आलो आहे तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी, मी दिल्लीला जात आहे मोदींचा जवळचा मित्र होण्यासाठी,’ ‘नरेंद्र मोदी अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा त्यांच्या चारोळ्या टाळ्या, शिट्ट्यांची दाद घेऊन गेल्या.