डबेवाले जाणार सहा दिवसांच्या सुट्टीवर

मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर लाखो मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले सोमवार, १५ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर आहेत. १५ ते २० एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील सर्व डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर २२ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.

मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे १५ ते २० एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याच्या सेवेस सुट्टी देण्यात आल्याचे ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ने स्पष्ट केले आहे.

मात्र, या सहा दिवसांच्या सुट्टीत महावीर जयंती, गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले चारच दिवस सुट्टी घेणार असून सोमवार, २२ एप्रिलपासून ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. २२ एप्रिलपासून पुन्हा सकाळी डबेवाला नेहमीप्रमाणे हजर होईल. उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेज, सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे डबेवाल्यांची सेवा काही प्रमाणात बंद आहे.

‘पगार कापू नये’

डबेवाले सुट्टीवर गेल्याने काही ग्राहकांची गैरसोय होणार असल्याने डबेवाले असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी मागणीही मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *