लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून अर्ज भरले जात आहे. तर निवडणुकीचा अर्ज सादर करताना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार २५ हजाराची अनामत रक्कम भरावी लागते. त्यानुसार सर्व उमेदवार अनामत रक्कम भरत असतात. पण या उमेदवारांमध्ये काही अनोखे उमेदवार सुद्धा असतात. त्यापैकीच भरत जैन हे पुणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवित असून त्यांनी आज चक्क २५ हजाराची अनामत रक्कम ही नोटांऐवजी एक, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांची चार बॅग भरून आणली व २५ हजाराची अनामत रक्कम भरली. या प्रकारामुळे काही वर्षापुर्वी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनीही निवडणुक लढविताना अशाच प्रकारची चिल्लर भरून निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडला होता. असाच अनुभव आज निवडणूक अधिकाऱ्यांना देखील आला. त्या ठिकाणी असणार्या दोन अधिकारी आणि उमेदवाराचा एक प्रतिनिधी यांना ही चिल्लर मोजण्यासाठी सुमारे दीड तास लागले.
याबाबत भरत जैन म्हणाले की, जनतेला सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख किरकोळ म्हणजेच चिल्लर समजतात. तसेच सध्या विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक होत असून त्यामुळे मी ही चिल्लर जमा करून माझ्या भावना व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.