एचआयव्हीग्रस्त बालकांना इथून पुढे कडू औषध प्यावे लागणार नाही. त्यांच्यासाठी आता द्रव स्वरुपातील (सिरप) औषधाऐवजी बारीक गोळ्या (पिलेट्स) दिल्या जाणार आहेत. शीव रुग्णालयातील बालकांच्या एचआयव्ही केंद्रासह देशभरातील आठ केंद्रांवर राबविलेल्या पहिल्या टप्प्यानंतर देशभरातील केंद्रावर हे औषध देण्याचा निर्णय राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (नॅको) घेतला आहे.
एचआयव्हीग्रस्त बालकांना लोपीनावीर आणि रिटोनावीर हे घटक असलेले औषध सिरप स्वरूपातून दिले जाते. हे औषध चवीला कडू असल्याने अनेकदा बालके औषधे पाजल्यानंतर उलटी करतात. उलटी झाल्यानंतर नेमके किती औषध पोटात गेले याचा अंदाज पालकांना येत नाही. मग पुन्हा औषध द्यावे लागते. अगदी तान्ह्य़ा मुलांना हे औषध पाजणे पालकांसाठी जिकिरीचे बनले आहे.
मोठय़ा व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या गोळ्यांचा आकार मोठा असल्याने त्या लहान मुलांना गिळणे शक्य नसते. यावर उपाय म्हणून बारीक गोळ्या स्वरूपात औषध देण्याची मागणी केली जात होती. लहान मुलांसाठी पर्यायी औषधांचा शोध सुरू होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नॅकोने पिलेट्स स्वरूपातील औषधाचा प्रायोगिक टप्पा महाराष्ट्रासह हैद्राबाद, बंगलोर, कोलकाता, दिल्ली अशा देशभरातील आठ केंद्रांवर सुरू केला. यामध्ये राज्यातील शीव रुग्णालयातील एचआयव्हीग्रस्त केंद्राची निवड केली होती.
गेल्या वर्षभरात ३८ बालकांवर शीव रुग्णालयात हे औषध दिले जात आहे. मुलांना सिरपप्रमाणे औषधाची चव लागत नसल्याने ते सहजपणे हे औषध घेतात. पालकांनाही औषध पाजणे सोप झाले आहे. या औषधातील घटक तेच आहेत फक्त याचे स्वरूप बदलले आहे. मुलांमध्ये याचे योग्य परिणामही दिसून येत आहेत. सहा महिन्यांपासून ते अगदी सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना हे औषध दिले गेले आहे. यामध्ये १५ मुले आणि २३ मुलींचा समावेश आहे. जी मुले सिरप स्वरूपातील औषधांना नकार दर्शवितात अशाच मुलांना सध्या गोळ्या सुरू केल्या असल्याची माहिती शीव रुग्णालयाच्या एचआयव्हीग्रस्त बालकांच्या केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. यशवंत गभाले यांनी दिली. पहिल्या टप्प्यामधील केंद्राकडून औषधाबाबतचा अनुभव मागितला होता. सर्वच केंद्रांवर मुलांकडून औषध घेण्याची सकारात्मकता वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून देशभरात गोळ्या स्वरूपातील औषध सुरू करण्याचे नॅकोने ठरविले आहे. गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधील एचआयव्ही केंद्रांवर औषध पुरवठा केला असून याचा वापर सुरू केला असल्याचे राष्ट्रीय प्रकल्प अधिकारी डॉ. मनीष बामरोटिया यांनी सांगितले.
औषध असे.. एका कॅप्सूलमध्ये साबुदाण्याहूनही कमी आकाराच्या बारीक गोळ्या असतात. या गोळ्या मूल खात असलेल्या कोणत्याही पदार्थामधून देतात. हा पदार्थ चमच्यामध्ये घेऊन त्यावर या गोळ्या कॅप्सूल उघडून टाकायच्या. त्यानंतर त्यावर पुन्हा थोडा पदार्थ घालायचा, जेणेकरून थेट चव मुलांना तोंडामध्ये लागणार नाही. या गोळ्या दुधातूनही देता येऊ शकतात. त्यामुळे अगदी तान्ह्य़ा बाळाला आईच्या दुधातूनही देणे शक्य आहे. गोळ्या विरघळल्या तर सिरपप्रमाणेच कडू चव लागणार असल्याने त्या पदार्थात विरघळू नयेत याची काळजी घ्यावी.