मुंबईतील चेंबूर या ठिकाणी असलेल्या सरगम सोसायटीला लागलेली आग अखेर नियंत्रणात आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. टिळकनगर स्थानकाजवळ ही इमारत आहे. आग लागलेल्या इमारतीचं नाव सरगम सोसायटी आहे. १४ व्या मजल्यावर ही आग लागली होती. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. या आगीत सुनीता जोशी (वय-७२), भालचंद्र जोशी (वय ७२), सुमन श्रीनावास जोशी (वय ८३ ) या तिघांचा मृत्यू झाला. तर श्रीनिवास जोशी (वय ८६) यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाचा एक जवानाही जखमी झाला.
दरम्यान अग्निशमन दलाला आग लागल्याची सूचना मिळताच १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी अथक प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागली त्या घऱात कोणी राहत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.
तीन दिवसांपूर्वी कांदिवली येथील कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला. तर अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत अकरा जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या दोन घटनांना दहा दिवसही होत नाहीत तोच पुन्हा एकदा आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
