भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टातून दिलासा मिळू शकलेला नाही. गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती.
आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने तेलतुंबडे यांची गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. मात्र, त्यांना कारवाईपासून देण्यात आलेले संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी तेलतुंबडे यांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती.
