वांग्याला २० पैसे प्रती किलोचा दर मिळाल्याने त्याने शेतच केले उद्ध्वस्त

शेतातील कांद्याला केवळ १ रुपया ४१ पैसे किलोचा दर मिळाल्याने ७५० किलो कांदाविक्रीतून मिळालेली सर्व रक्कम पंतप्रधानांना दान करण्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. साकुरी येथील राजेंद्र बावके या शेतकऱ्याने शेतातील वांग्यांना अवघा २० पैसे प्रती किलोचा भाव मिळाल्याने उद्विग्न होऊन संपूर्ण शेतातील वांग्याची झाडेच उपटून फेकून देत शेतच उद्ध्वस्त केले.

दोन लाख रुपयांची गुंतवणूक करुन राजेंद्र यांना केवळ ६५ हजार रुपये वांगी विक्रीमधून परत मिळाले. यामुळे संतापलेल्या रांजेद्र यांनी त्यानंतर पहिला तोडा झालेल्या शेतामध्ये जाऊन वांग्याची सर्व रोपटीच उपटून फेकून दिली. भविष्यात होणारा तोटा टाळण्यासाठी त्यांनी परत वांग्यांचा तोडा न करण्याचा निर्णय घेताल.

या संपूर्ण प्रकाराबद्दल बोलताना राजेंद्र यांनी आपली भूमिका मांडली. ‘मी दोन एकरावर वांग्याचे पीक घेतले होते. ठीपक सिंचनाने पाणी देण्याच्या उद्देशाने संपूर्ण शेतामध्ये पाईप टाकले. तसेच उत्पादन चांगले यावे म्हणून मी चांगल्या प्रतिचे खत वापरले, औषधे फवारली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला. यासाठी मला एकूण दोन लाखांचा खर्च आला. मात्र व्यापाऱ्यांकडे पहिल्या तोड्यानंतर वांगी विकल्यानंतर २० पैसे प्रती किलोच्या दराने मला केवळ ६५ हजार रुपयेच मिळाले’ अशी माहिती राजेंद्र यांनी दिली.

आता ज्यांच्याकडून मी खतं आणि औषधे विकत घेतली होती त्यांनाही ३५ हजार रुपये देणे बाकी आहे. हे ३५ हजार मी कसे उभे करणार आहे याचा मला काहीच अंदाज नसल्याचेही राजेंद्र यांनी सांगितले. नाशिक तसेच सुरत येथील घाऊक बाजारामध्ये हा शेतमाल विकण्याचा प्रयत्न केला असता जास्तीत जास्त २० पैसे प्रती किलो दर मिळल्याची माहिती राजेंद्र यांनी दिली. वांग्याच्या शेतीतून चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा मला होती. मात्र मागील काही महिन्यांमध्ये घेतलेल्या परिश्रमानंतरही मला तोटाच झाला. त्यामुळेच यापुढे वांग्याची शेती करणार नाही असा निर्धार करुन शेतातील रोपे उपटून फेकल्याचे राजेंद्र म्हणाले. ३५ हजार देणं बाकी असतानाच घरी पाळलेल्या तीन गायांचे खाद्य आणण्यासाठीही आता पैसे नसल्याने त्यांच्या खाद्याची व्यवस्था कशी करायची या प्रश्नही माझ्यासमोर असल्याचे राजेंद्र यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *