कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १00 फूट खाली हे सर्व ट्रेकर्स अडकले आहेत. या ट्रेकर्सची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या मदतीने प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलिसांनादेखील यासंदर्भात समन्वय ठेवून ट्रेकर्सची सुटका कशी होईल, ते पाहण्यास सांगितले आहे.
डॉ. अडवाणी यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्यासोबत पाच महिला व १७ पुरु ष आहेत. ते कोकणकडापासून खाली ८00 फूट आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलिसांनादेखील या घटनेविषयी कळवले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
जिल्हा प्रशासन ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सातत्याने त्यांच्या तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची मदत घेतली जात आहे. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी, तसेच खोपोली येथईल शिवदुर्ग संस्था मदतीसाठी रवाना झाली आहे. तेथे नेटवर्क नसल्याने संपर्क करण्यात अडचण येत आहे.
दरीत अडकलेले सर्व ट्रेकर्स सुरक्षित असून त्यांना रात्रभर राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली आहे. १५ भाकऱ्या, पिण्यासाठी पाणी व थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना ब्लँकेट पाठवण्यात आले आहेत. अंधार, थंडी दूर सारण्यासाठी त्यांनी शेकोटी पेटवली आहे, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
