भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या मजुरांना चिरडले; ५ जणांचा मृत्यू, ९ जखमी

हरयाणातील हिस्सार जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री उशीरा एक हृदयदावक घटना घडली आहे. येथील जिंदाल पुलावर रात्रीच्या सुमारास पदपथावर झोपलेल्या मजूरांना एका भरधाव कारने चिरडले. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मृत पावलेले बहुतेक मजूर हे बिहारचे रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, पदपथावर झोपलेल्या मजुरांना चिरडल्यानंतर भरधाव वेगातील कार समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळली. त्यानंतर पुलावरून सुमारे ७० फूट खोल खाली कोसळली. या कारमधील लोक दिल्लीकडे जात होते. दरम्यान, अपघातातील जखमींचा आरडा ओरडा ऐकून जिंदाल फॅक्टरीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली.

माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार खाली कोसळल्यानंतर त्यामध्ये प्रवास करणारे लोक पळून गेले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *