पुलगावातील सैन्याच्या दारुगोळा भांडारात स्फोट, सहा ठार

भारतीय सैन्यासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

वर्धा येथील पुलगाव येथे केंद्रीय दारूगोळा भांडार आहे. मंगळवारी सकाळी मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात ११ जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. स्फोटांमध्ये मृत्यू झालेले केलापूर गावातील शेतमजूर असल्याचे समजते.

मंगळवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात ११ जण जखमी झाले. तर सहा जणांचा स्फोटात मृत्यू झाला. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. निकामी बॉम्बचे जस्त कथिल अॅल्युमिनियम वेचण्यासाठी गावातील ग्रामस्थ फायरिंग रेंजमध्ये जातात, असे सांगितले जाते. यासाठी काही शेतमजूर तिथे गेले होते, असे समजते. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *