उत्तराखंडने दिला गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा

उत्तराखंडने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं उत्तराखंड हे पहिलच राज्य ठरलं आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक बुधवारी उत्तराखंड विधानसभेत सर्वसहमतीने मंजूर झाल्याचं सांगण्यात येतं.

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही गायीचं महत्त्व माहीत आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही गायीला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आल्याचं उत्तराखंडच्या पशूपालन मंत्री रेखा आर्य यांनी सांगितलं.

धार्मिक ग्रंथांमध्येही गायीचा अनेकदा उल्लेख आला आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करत असल्याचं म्हटलं जातं. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिल्याने गायींच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलता येतील. शिवाय गोहत्याही थांबतील, असं आर्य म्हणाल्या. दरम्यान, भाजपच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने टीका केली आहे. आम्ही सर्वच जण गायीचा सन्मान करतो. पण गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन भाजपला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? असा सवाल करतानाच राज्यातील गोशाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. भाकड गायींना लोक सोडून देतात, त्यांचा सांभाळ करत नाहीत. राज्यात पशू दवाखान्यांचीही कमतरता आहे, असं विरोधी पक्षनेत्या इंदिरा हृदयेश यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *