गुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू

एखाद्याची मस्करी करणे किती महागात पडू शकते हे कोल्हापूरमधील एका थरारक घटनेतून दिसून आलं आहे. एका कामगाराने मस्करीत दुसऱ्या कामगाराच्या गुद्द्वारात हवा सोडल्याने त्या कामगाराचा पोट फुगून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

कोल्हापूरच्या अतिग्रे येथील फॉन्ड्री गावातील एका फॅक्ट्रीत ३ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. कामावरून घरी जात असताना कारखान्यातील धातूचे कण अंगावर चिकटलेले असतात, ते काढण्यासाठी एका पंपाद्वारे कामगारांच्या अंगावर हवा मारली जाते. ३ सप्टेंबर रोजी आदित्यच्या अंगावरील धातूचे कण काढण्यासाठी सुपरवायझरने त्याच्या अंगावर हवा मारण्यास सुरुवात केली. मस्करी करता करता त्याने आदित्यच्या गुद्द्वारात ही हवा सोडली. त्यामुळे आदित्य जागीच कोसळला आणि पोट फुगल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर सुपरवायझरने तिथून पळ काढला असून तो अजूनही गायब आहे.

फॅक्ट्रीत बेशुद्ध पडलेल्या आदित्यला इतर कामगारांनी तातडीने इचलकरंजीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कोल्हापूरला हलविण्यात आले. मात्र कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आदित्य आजारी नसतानाही त्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या घरच्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी फॅक्ट्रीतील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली असता त्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले असून फरार सुपरवायझरचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *