मलेशियात अपहरणानंतर सुटका झालेले डोंबिवलीतील दोघे भाऊ सुखरुप परतले

व्यावसायानिमित्त मलेशियाच्या दौऱ्यावर गेलेल्या डोंबिवलीतील दोन भावांचे अपहरण करुन काही दिवसांनंतर सुटका करण्यात आलेले दोघे भाऊ आज (दि.११) मुंबईत परतले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटना कथन केली. पैशांसाठी आपले अपहरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात यश आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहन प्रकाश वैद्य (वय ३६) आणि कौस्तुभ प्रकाश वैद्य (वय ३१) या दोन सख्या भावांचे मलेशियात अपहरण झाले होते. या अपहरण नाट्यानंतर ते दोघेही आज मुंबईत सुखरुप परतले. ‘रॉक फ्रोझन फूड’ या त्यांच्या मासे निर्यात करणाऱ्या कंपनीला मलेशियास्थित ‘मिस ली फ्रोझन फूड्स’ या कंपनीकडून व्यावसायिक ऑफर आली होती. त्यासंदर्भात व्यवहार करण्यासाठी हे दोघे भाऊ १ ऑगस्ट रोजी मलेशियाला गेले होते. दरम्यान, मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथे २ ऑगस्ट रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले. या काळात त्यांना अपहरणकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली, जेवणही पुरेसे देण्यात येत नव्हते. अपहरणकर्ते तमिळ आणि इंग्रजी भाषेत संवाद साधत असल्याचेही या दोघा भावांनी सांगितले आहे.

अपहरणाची माहिती या दोघा भावांनी मुंबईतील त्यांच्या कुटुंबियांना कळवली त्यानंतर वैद्य कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. अपहरणाची माहिती मिळताच परराष्ट्र खात्याने तेथील भारतीय उच्चायुक्तांना कळवले. त्यांनी मलेशियातील पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा नोंदवला. त्याचबरोबर या दोघा भावांचे काका राजीव वैद्य यांनी ठाणे पोलिसांमध्ये ४ ऑगस्ट रोजी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

मलेशियातील पोलिसांनी तातडीने तपासकार्य हाती घेतले. त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तालयातील व्यक्तीही मदतीला देण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दोघा भावांची सुखरूप सुटका झाली. अपहरणकर्त्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *