कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने दांपत्याला कपडे काढून बेदम मारहाण करत जबदस्तीने मूत्रप्राशन करायला लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे ही घटना घडली आहे. आरोपींमधील एकजण हा संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये शूट करत होता. व्हिडीओत तरुणाला खांबाला बांधलेलं दिसत असून, यावेळी तरुणी खाली जमिनीवर बसलेली दिसत आहे. शिक्षा दिल्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आलं. मात्र त्याआधी आरोपीने कुटुंबाच्या सन्मानाला धक्का दिल्याबद्दल तुम्हाला शिक्षा देत असल्याचं त्यांना सांगितलं.
दोघेही पीडित त्याच गावातील रहिवासी आहेत. तरुणाचं वय २३ असून, तरुणी २१ वर्षांची आहे. दोघांनी कुटुंबाच्या इच्छेविरोधात एकमेकांसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी त्रास देऊ नये यासाठी तरुणाने त्यांना ७० हजार रोख रुपये आणि दोन बकऱ्या दिल्या होत्या. मात्र जात पंचायतीच्या आदेशानंतर दोघांवर हल्ला करण्यात आला.
‘दोघेही गेल्याच आठवड्यात गुजरातहून परतले होते. तरुणाच्या काकांच्या घरी दोघे राहत होते. तरुणीच्या कुटुंबियांना याबद्दल कळताच त्यांनी तिचं अपहरण केलं’, अशी माहिती पोलीस अधिकारी विकास कापनीस यांनी दिली आहे.
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत दांपत्याने सांगितलं आहे की, ‘पत्नीच्या कुटुंबियांनी पहाटे ४ वाजता बंदुकीचा धाक दाखवत आमचं अपहरण केलं. पत्नीचे कपडे काढून तिला बेदम मारहणार करण्यात आली. तिचे केसही कापण्यात आले’. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.