अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (वय ४२) यांनी रविवारी दुपारी एक वाजता छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या केलेल्या कचरू कल्याणे यांच्या खिशात ‘एक मराठा लाख मराठा’ असे लिहिलेली चिठ्ठी सापडली असून समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यात नमूद करण्यात आलेले आहे. या पाश्र्वभूमीवर संतप्त जमावाने औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदें यांच्या धर्तीवर मदत मिळावी, याच्या ठोस निर्णयासाठी आंदोलनकर्त्यांनी पंचनामा अडवला. अखेर तहसीलदार अरिवद नरसीकर यांनी लेखी आणि ठोस आश्वासन दिल्यानंतर पंचनाम्यासाठी पार्थिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कचरू कल्याणे यांची परिस्थिती नाजूक होती. ते उच्चशिक्षित असूनही मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. तसेच आई, पत्नी व तीन मुली असे कुटुंब आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावू. आता ‘करो या मरो’ लढाई करावी लागेल. मी ही पिंपळगाव प्रमाणेच करू काय की? अशी चर्चा ते करत असल्याचे सांगण्यात आले.
