आंबेनळी घाट दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण

 आंबेनळी घाट बस दुर्घटनेतील मदत व बचावकार्य २६ तासांनी पूर्ण झाले. बसमध्ये अडकलेले उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांना यश आले. या भीषण दुर्घटनेत तीस जणांचा बळी गेल्याचे मोहिमेनंतर स्पष्ट झाले. यानंतर मृतदेह शोध व बचाव मोहीम थांबवण्यात आली.

शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस महाबळेश्वरच्या दिशेने निघाली होती. मात्र आंबेनळी घाटात दाभीळजवळ बस दरीत कोसळली. महाबळेश्वर आणि पोलादपूर येथील ट्रेकर्सच्या मदतीने सुरुवातीला मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. संध्याकाळी सातच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक पुण्याहून आले. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास हे काम पूर्ण झाले. बचाव पथकांनी सर्व तीस मृतदेह ५०० फूट खोल दरीतून बाहेर काढले.

पोलादपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी संध्याकाळपर्यंत बसमध्ये ३४ प्रवाशी असल्याची चर्चा सुरू होती. मात्र रात्री उशिरा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने बसमध्ये ३१ प्रवाशी असल्याचे जाहीर केले. यापैकी एक जण बचावला होता. शिवसेनेकडून मृतदेहांच्या वारसांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी जाहीर केली.

आंबेनळी बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी दापोली शहरातील सर्व व्यावसायिकांनी आज आपापले व्यवसाय बंद ठेवून दुखवटा पाळला. दरम्यान, मृतांमध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील २७ जण, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील दोन जण, तर सातारा जिल्ह्य़ातील एकाचा समावेश आहे. तसेच प्रशासन शाखेतील सर्वाधिक सात कर्मचारी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेवटच्या सहा मृतदेहांचे चेहरे विच्छिन्न अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. अखेरीस त्यांची कपडय़ांवरून शहानिशा करण्यात आली. प्रशासन शाखेतील संदीप भोसले, संजीव झगडे, पंकज कदम, नीलेश तांबे, प्रमोद जाधव, प्रमोद शिगवण, संतोष झगडे तसेच बांधकाम विभागातील हेमंत सुर्वे, राजेश सावंत, राजाराम गावडे आणि सचिन गुजर, संशोधन विभागातील संदीप सुवरे, सचिन गिम्हवणेकर आणि राजेश बंडबे तसेच लेखा विभागातील सुनील साटले, रत्नाकर पागडे, दत्तात्रय धायगुडे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. निम्नस्तर शिक्षण विभागातील सुनील कदम, जयंत चोगले आणि सामान्य शाखेतील सुयश बाळ व सचिन झगडे, निवृत्तिवेतन विभागातील रोशन तबीब, शिक्षण विभागातील संतोष जालगावकर, परीक्षा शाखेतील विक्रांत शिंदे, वनस्पतिशास्त्र विभागातील रितेश जाधव, माहिती तंत्रज्ञान केंद्रातील राजू रिसबूड, वाकवली प्रक्षेत्रावरील किशोर चोगले, फोंडाघाट केंद्रातील विनायक सावंत आदी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. प्रशांत भांबीड आणि संदीप झगडे हे चालक म्हणून सेवेत होते. यापैकी धायगुडे वगळता सर्व कोकणातील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *