मुसळधार पाऊस आणि पूरावर मात करत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे महत्त्वपूर्ण चित्रीकरण

छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम या मालिकेनं केलं. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होत आहे.

संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते. काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. शंभुराजे दिलेरखानाकडे श्री क्षेत्र माहुली येथून नदी ओलांडून गेले अशी इतिहासात नोंद आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’च्या टीमने याच ठिकाणी त्याचं चित्रीकरण केलं आहे.

मालिकेच्या संपूर्ण टीमने अक्षरश: तारेवरची कसरत करत जिद्दीने हे चित्रीकरण पूर्ण केले. चित्रीकरणादरम्यान असलेला धुवाँधार पाऊस आणि कृष्णावेण्णेच्या पाण्याला आलेला पूर या सगळ्यावर मात करत संभाजीच्या टीमने चित्रित केलेले हे रोमहर्षक चित्रण प्रेक्षकांना रविवारच्या भागात पाहता येणार आहे. जिथे इतिहास घडला त्याभागात चित्रीकरण करण्याचा कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव पाहायचे असल्यास झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा रविवारी २२ जुलैला रात्रौ ९.०० वाजता प्रसारित होणारा विशेष भाग पहायला विसरू नका.

जगदंब क्रिएशन’ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे निर्माते डॅा. घनश्याम राव, विलास सावंत, अमोल कोल्हे असून दिग्दर्शन विवेक देशपांडे, कार्तिक केंढे यांचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *