सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख झालेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंधेरीतील डी एन नगर पोलिसांनी २० वर्षांच्या कोरियोग्राफरला अटक केली आहे. सोमवारी पीडित मुलगी अंधेरीत बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर कोरियोग्राफरचे कृत्य उघड झाले.
सोमवारी संध्याकाळी अंधेरीतील एका हॉटेलजवळ १७ वर्षांची मुलगी बेशुद्धावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता पीडित मुलीच्या पालकांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले.
पीडित मुलीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने पोलिसांना जबाब दिला. ‘सोशल नेटवर्किंग ओळख झालेल्या एका कोरियोग्राफरने मला अंधेरीत भेटायला बोलावले होते. अंधेरीत पोहोचल्यानंतर कोरियोग्राफरने तिला अज्ञात स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला, असे तिने सांगितले. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीकडून कोरियोग्राफरचा नंबर मिळवला आणि त्या आधारे नराधम कोरियोग्राफरचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीला नालासोपारा येथून अटक केली असून तो एका डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.