गोवंडीत घर कोसळून कामगाराचा मृत्यू

घराचे काम सुरू असताना घराचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची, तर एक कामगार जखमी झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी गोवंडी शिवाजीनगर येथे घडली. विजयकुमार राजपाल (३३) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे, तर जखमी कामगार रोहितकुमार शर्मा यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोवंडीतील गजानन नगर परिसरात प्लॉट नंबर २ येथे घराच्या दुरुस्तीसाठी काही भाग कामगारांकडून तोडला जात होता. तेव्हा हा भाग कामगारांवर कोसळला आणि यात दोन कामगार अडकले. स्थानिकांनी ढिगारा बाजूला करून दोघांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र विजयकुमार राजपाल यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या परिसरात अनेक ठिकाणी अवैध बांधकामे होत आहेत. या अवैध बांधकामांवर निर्बंध यावेत अशी मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरत आहे. दोन महिन्यांपूर्वीही घर कोसळून त्यात दोन लहान मुलांसह चार जणांचा बळी गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *