सोमय्यांनी फाडल्या मराठी फेरीवाल्याच्या नोटा

मुलुंडमधील जनसंपर्क अभियानादरम्यान एका फेरीवाल्याशी झालेल्या वादानंतर चिडलेले भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी त्या फेरीवाल्याला धक्काबुक्की करत त्याच्या हातातील ५० रुपयांच्या नोटा फाडून टाकल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात नवघर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, सोमय्या यांच्या वतीने फेरीवाल्याविरोधातही उलट तक्रार करण्यात आली आहे.

खासदार सोमय्या सकाळी आठच्या सुमारास संभाजीराजे मैदानात पोहोचले. त्यावेळी या मैदानात भाजपच्या नगरसेविकेमार्फत स्केटिंग ट्रॅक बांधण्याच्या तसेच, मैदानातील काही भागाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला नागरिकांनी विरोध केला. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयानेही या कामाला स्थगिती दिली आहे. ‘मैदानाचा बळी का घेतला जातो आहे, स्केटिंगची आम्हाला गरज नाही’, असे विविध प्रश्न विचारून नागरिकांनी सोमय्या यांना भंडावून सोडले.

या घटनेनंतर सौमय्या मैदानाच्या बाजूने जात असताना नागरिकांनी परिसरातील फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली. यावेळी एक महिलेने सचिन खरात या आंबेविक्रेत्याकडून आंबे विकत घेऊन त्याचे १५० रुपये त्याला दिले. हे पैसे सोमय्या यांनी हिसकावून घेऊन त्यातील २० रुपयांच्या दोन व दहा रुपयाची एक नोट खेचून फाडून टाकली. त्यांनी फेरीवाल्याला धक्काबुक्कीही केली. सचिनला त्याठिकाणी फळे विकण्यास मनाई करत सोमय्या यांनी त्याची पोलिसात तक्रारही केली. पोलिसांनी ती तक्रार नोंदवून सचिनला १२५० रुपये दंड ठोठावला. त्यामुळे सचिननेही सोमय्या यांनी नोटा फाडल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. खासदार सोमय्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२७ आणि ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.

दरम्यान, शिशिर शिंदे यांनी या प्रकरणी पोलिसांनी सोमय्यांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवणे अपेक्षित होते, असे सांगत, एखाद्याच्या हातून पैसे हिसकावणे, ते फाडणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजित चव्हाण यांनी, सोमय्या यांच्या दबावामुळे पोलिसांनी नोटा फाडण्याचा गंभीर गुन्हा दखल न करता फक्त धमकी आणि मालमत्तेचे नुकसान असे दोन गुन्हे दाखल केल्याचे सांगितले.

सोमय्या ‘नॉट रिचेबल’

याबाबत सोमय्या यांच्याकडे विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा मोबाइल फोन त्यांनी एका कर्मचाऱ्याकडे दिल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *