राज्यातील सर्वात लहान वयात सरपास शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली ऊर्वी पाटील

हिमालयातील १३ हजार ८०० फूट उंचीवर असलेले सरपास शिखर. काळाकुट्ट भोवताल. तापमान शून्याखालीही ८ सेल्सियस, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगवान वारे, अशा प्रतिकूल स्थितीत जिल्ह्यच्या पूर्वेला असलेल्या दंडोबाच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या १० वर्षांच्या ऊर्वीने सरपास शिखरावर तिरंगा रोवला. जिल्ह्यच्या इतिहासात नोंद करीत असतानाच राज्यातील सर्वात लहान वयात सरपास शिखर सर करणारी ऊर्वी पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली.

ऊर्वी अनिल पाटील हिचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील खरिशग. वडिलांच्या नोकरीनिमित्त सध्या वास्तव्य गोव्यात. शिखर सर करून परतल्यावर तिने या विक्रमाची माहिती देताना सांगितले, की सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कॅ म्प वरून ४ मे २०१८ पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे छोटे ट्रेक केले. पुढे ७ मे पासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. कसोल हे ६ हजार ५०० फुटावरचा बेस कॅम्प असून पुढे ग्राहण (७८०० फूट), पद्री (९३०० फूट) मिन्थाज (११२०० फूट), नगारू (१२५०० फूट), बिस्करी (११००० फूट) आणि बंधकथाज (८००० फूट) असे कॅम्प होते.

तिने सांगितले, की या सर्व कॅम्पमध्ये नगारू ते बिस्करी या कॅम्प दरम्यान सरपास हे १३ हजार ८०० फुटांवरील शिखर आहे आणि हे शिखर ट्रेकिंगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे १४ कि.मी. चा संपूर्ण प्रवास बर्फातला असून अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे २ वाजता होते. चहा आणि गरम पाण्याबरोबर गूळ व फुटाणे हा अल्पोपाहार करून मी ट्रेकिंगला सुरुवात केली. मात्र, याच वेळेस वातावरण अचानक बिघडले आणि बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याचे ऊर्वीने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *