धक्कादायक ! चित्रपटागृहात आईने मुलीला त्याच्याकडे सोपवलं, ‘तो’ करत राहिला विनयभंग

केरळमध्ये चित्रपटगृहात एका १० वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही मिळाल्यानंतरही कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर अखेर दबाव येण्यास सुरुवात झाल्यानंतरच आरोपीविरोधात कारवाई करत अटक करण्यात आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी घटनेचा पुरावा देणारे सीसीटीव्ही प्रसिद्ध केल्यानंतर ते व्हायरल झाले, ज्यानंतर कारवाईला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईलाही पोलिसांनी घटनेची माहिती न दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. महिला आपल्याला घटनेची कोणीतीही माहिती नसल्याचा दावा करत असली, तरी पोलिसांनी तिनेच मुलीला आरोपीच्या हवाली करण्यासाठी चित्रपटगृहात नेलं असल्याचं सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण ?
ही घटना १८ एप्रिल रोजी घडली आहे. आरोपी के व्ही मोईथिनकुट्टी याने मल्लपुरम येथील चित्रपटगृहात १० वर्षाच्या मुलीचा तिच्या आईच्या उपस्थितीत विनयभंग केला. घटनेचे सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये आरोपी मुलगी आणि महिलेच्या मधोमध बसला असल्याचे दिसत आहे. चित्रपट सुरु असताना आरोपी वारंवार मुलीचा विनयभंग करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, मुलीची आई मात्र यावेळी बाजूलाच बसलेली आहे.

चित्रपटगृहाने हे फुटेज लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओकडे सोपवलं. यानंतर एनजीओने पोलिसांकडे धाव घेत हा पुरावा त्यांच्यासमोर सादर केला. पोलिसांनी मात्र पुरावा हाती असतानाही कारवाई करण्यास विलंब केला. अखेर एका स्थानिक वृत्तवाहिनीने हे फुटेज प्रसिद्ध केले. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. यानंतर अखेर पोलिसांनी धावपळ करत कारवाईला सुरुवात केली.

आरोपीला अटक –
शनिवारी आरोपी मोईथिनकुट्टी याला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम ३५४ आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईलाही अटक करण्यात आली असून, तिच्यावरही पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात आरोपीला मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला असून, तिला निर्भया केंद्रात पाठवण्यात आलं आहे. आरोपी आणि महिलेने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *