सोलापूर पोलीस आयुक्तालयात चाकूधारी तरुणीचा गोंधळ

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात काटेकोर सुरक्षा व्यवस्था असूनही एका तरुणीने हातात चाकू घेऊन पोलीस आयुक्तालयात घुसून गोंघळ घातला. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.  तिच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीही एका तरुणीने पोलीस आयुक्तालयात येऊन गोंधळ घातला होता.

सोना संतोष कटकधोंड (वय २७, रा. कोंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) असे चाकूसह पोलीस आयुक्तालयात येऊन गोंधळ घालणाऱ्या तरुणीचे नाव आहे. सकाळी तिने चाकू हातात घेऊन पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ क्रमांक २ च्या सहायक पोलीस आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला. तेथे तिने आरडाओरड सुरू केल्यानंतरच तिच्याकडे पोलिसांचे लक्ष गेले. महिला पोलीस शिपाई मंगला बोरामणीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोना कटकधोंड हिच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोना कटकधोंड ही मनोरुग्ण असल्याची शक्यता आहे. मानस उपचार तज्ज्ञांकडून तिच्यावर वैद्यकीय उपचार झाल्यास व तिचे मानसिक समुपदेशन झाल्यास हातात चाकू घेऊन पोलीस आयुक्तालयात घुसण्याचा तिचा हेतू समजू शकेल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *