लग्न म्हणजे एक असं बंधन ज्यामुळे फक्त दोन मनंच नाहीत, तर दोन कुटुंब, त्यांचे आचारविचार आणि समजुती, केव्हा केव्हा तर दोन संस्कृती जोडल्या जातात. बऱ्याचदा लग्न करण्यापूर्वी नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी एखादी अट समोर ठेवते. अशीच एक अट ठेवणारी नांदेडची नवरी मुलगी सध्या बरीच चर्चेत आली आहे. आपल्या गतिमंद मोठ्या बहिणीलाही जो पत्नी म्हणून स्वीकारेल त्याच्याशीच लग्नगाठ बांधणार अशी प्रतिज्ञा केलेल्या तरुणीची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. नांदेडमधील बिलोली तालुक्यातील कोटग्याळ गावात हा अनोखा असा विवाहसोहळा पार पडला. जिथे एकाच नवरदेवाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्नगाठ बांधली.
कोटग्याळ गावात राहणाऱ्या गंगाधर लालगोंडा शिरगिरे यांना एकूण चार मुली आहेत. पण, त्यांची सर्वात मोठी मुलगी धुरपताबाई ही अंशत: गतीमंद असल्यामुळे तिच्यासोबत कोणीही लग्न करण्यास तयार नव्हतं. शिरगिरे यांच्या दोन मुलींनी लग्न केलं. ज्यानंतर त्यांच्या सर्वात धाकट्या मुलीसाठी म्हणजेच राजश्रीसाठीही स्थळं येऊ लागली. पण, त्यांच्या धाकट्या मुलीने आपल्या मोठ्या बहिणीप्रती असलेली जबाबदारी ओळखली होती. मुख्य म्हणजे हीच जबाबदारी ओळखत बहिणीला कधीच एकटं न सोडण्याचा निर्धारही तिने केला होता.
लग्नालाठीची मागणी येत असतानाच शेजारच्या समराळा या गावातील साईनाथ सायन्ना उरेकर या तरुणाच्या घरून राजश्रीसाठी मागणं आलं. लग्नाच्या विविध चर्चांमध्ये राजश्रीने अशी अट ठेवली की, माझी बहिण धुरपताबाई हिलासुध्दा माझ्यासोबत स्वत:ची पत्नी बनविण्याची तयारी असेल त्याच तरुणासोबत मी लग्न करेन. राजश्रीने आपल्या मनातील बाब सर्वांसमक्ष मांडली तेव्हा यावर बरीच चर्चा झाली. पण, तिने ठेवलेल्या या अटीमध्ये सर्वांनाच तिचं आपल्या बहिणीप्रती असणारं नि:स्वार्थ प्रेम दिसून आलं. राजश्रीच्या या मागणीचा स्वीकार करत साईनाथ आणि त्याच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी होकार दिला आणि अखेर हा अनोखा विवाहसोहळा पार पडला.
नांदेडमध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची बरीच चर्चाही झाली. मुख्य म्हणजे या लग्नाची पत्रिकाही फार लक्षवेधी ठरली. एकाच लग्नपत्रिकेत दोन वधू आणि एक वराची नावं जेव्हा लोकांनी पाहिली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण राजश्रीची कल्पना, आपल्या गतीमंद बहिणीला आपली सवत बनवून आयुष्यभर तिचा सांभाळ करण्याचा तिचा निर्णय सर्वांनाच आवडला असून, अनेकांनीच राजश्रीच्या निर्णयाची प्रशंसा केली.
बुधवार दि. ३ मे २०१८ रोजी हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात कोटग्याळ येथे पार पडला. या लग्नसोहळ्यात बिलोली, धर्माबाद, कोटग्याळ, समराळा या भागातील निमंत्रित आणि ज्यांना निमंत्रण मिळाले नाही ते असेही बरेच पाहुणे सहभागी झाले. उपस्थितांनी यावेळी तिनही विवाहितांना शुभाशिर्वाद दिले.
