रमेश कराड यांच्याकडे पाऊण किलो सोने ; 33 लाखाची कार

पाऊण किलो सोने, ३३ लाखाची कार, लातूरच्या मध्यवर्ती भागात अर्धा एकराचा भूखंड आणि ५० एकर शेती अशी तब्बल पावणेसहा कोटी रूपयांची मालमत्ता रमेश कराड  यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केली आहे. कोट्यवधींची माया असलेल्या कराड यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचा फौजदारी अथवा राजकीय खटला नाही, हे विशेष.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीतील परंतु ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झालेले रमेश कराड करोडपती उमेदवार आहेत. मागील वर्षी आयकर विभागाला सादर केलेल्या विवरणपत्रात स्वतःच्या व पत्नीच्या नावे ३५ लाख ७८ हजार रूपयांचे वार्षिक उत्पन्न असल्याचे त्यांनी दाखविले आहे. त्यांच्याकडे सध्या सव्वा लाख रूपयांची तर पत्नीकडे दीड लाख रूपयांची रोकड असल्याचेही त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. विविध बँक खात्यात असलेल्या रकमादेखील लाखांच्या घरात आहेत. त्यांच्या स्वतःच्या नावे विविध बँक खात्यात २३ लाख ३० हजार ७९८ रूपयांची रोकड उपलब्ध आहे. मुलाच्या नावे १ लाख ९५ हजार रूपये आहेत.

रमेश कराड यांचा थाट डोळे दीपवणारा आहे. ३३ लाख ८२ हजार रूपये किंमतीची अलीशान कार ते स्वतःसाठी वापरतात. तर त्यांच्या पत्नीकडे ४१ लाख रूपयाच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत. कराड यांच्याकडे ९ लाख रूपये किंमतीचे ३० तोळे सोने तर पत्नीकडे १२ लाख ३० हजार रूपयांचे ४१ तोळे सोने आहे. त्यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रात पत्नी, मुलगा आणि स्वतःच्या नावे एकूण २ कोटी १९ लाख १९ हजार ५१० रूपयांची जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. तर त्यांच्या कुटुंबीयांकडे असलेल्या स्थावर मालमत्तेची शासकीय दरानुसार ३ कोटी ५५ लाख ७३ हजार रूपये किंमत असल्याचे त्यांनी शपथपत्रात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *