मराठी, गुजराती शिक्षक इंग्रजी शाळांमध्ये

मुंबई महापालिकेच्या मराठी आणि गुजराती माध्यमाच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समायोजन करण्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने ठरविले आहे. मुंबई आणि परिसरातील मराठी आणि गुजराती माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या वेगाने घटत असल्याने सर्वात जास्त याच शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

गुजराती माध्यमाच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांपैकी एकालाही सामावून घेण्यासाठी जागा शिल्लक नाही. मराठी माध्यमाच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनही रखडले आहे. त्याचवेळी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षकच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, मराठी आणि गुजराती शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

मराठी आणि गुजराती माध्यमांतील शंभर ते सव्वाशे शिक्षक अतिरिक्त असून, इंग्रजी माध्यमात जवळपास तीनशे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ज्या शिक्षकांनी यापूर्वी ब्रिटिश कौन्सिलकडून इंग्रजीचे आणि इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण घेतले आहे अशा शिक्षकांचे इंग्रजी माध्यमात समायोजन करण्यात येणार आहे. या शिक्षकांना २६ दिवस पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या आणि पूर्ण वेतन घेणाऱ्या शिक्षकांना काम मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *