३२ लाखांचे सोने जप्त

मुंबईतील देशांतर्गत विमानतळावर मंगळवारी पहाटे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा मंडळाने केलेल्या कारवाईत ३२ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. बुटांमधून सोने तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाकडून ‘सीआयएसएफ’च्या जवानांनी तब्बल एक किलो सहा ग्रॅम सोन्याचे सात ‘बार’ जप्त केले.

याप्रकरणी अटक केलेल्या प्रवाशाचे नाव मूसा एम. असे आहे. मँगलोरकडे निघालेल्या मूसाची ‘टर्मिनल’ भागात नियमित झडती होत असताना त्याच्या बुटांमध्ये काही तरी संशयास्पद असल्याचे जवानांना आढळले. त्यामुळे त्याची अधिक चौकशी केल्यानंतर आणि बुटांची नीट तपासणी केल्यानंतर त्यात सोन्याचे सात ‘बार’ दडवून ठेवल्याचे आढळले. या सोन्याचे मूल्य ३२ लाख रुपये असल्याचे उघड झाले. त्यानंतर मूसाला सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती ‘सीआयएसएफ’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *