शीना बोरा हत्याकांड प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. तिने तिला सुरू नसलेल्या औषधांचा हेवी डोस घेतल्याचे समोर आले आहे. जी औषधे तिला लिहून देण्यात आलीच नव्हती ती औषधे तिने मोठ्या प्रमाणवर घेतली असल्याचे हिंदुजा हॉस्पिटलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
औषधांचा ओव्हरडोस झाल्याने इंद्राणी मुखर्जीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या युरिनचे सँपल हिंदुजा रूग्णालयात पाठवण्यात आले होते. या तपसाणी अहवालातच इंद्राणीने तुरुंगात तिला न लिहून दिलेल्या गोळ्या घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
इंद्राणी मुखर्जीला जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी औषधांचा ओव्हरडोस पोटात गेल्याने ती बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिला तातडीने जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंद्राणीच्या युरीनचे नमुने चाचणीसाठी हिंदुजा रूग्णालयात पाठवण्यात आले होते.
युरिन रिपोर्टमध्ये इंद्राणीच्या युरिनमध्ये बेंझोडायझेपिनचे प्रमाण ६४३० ng/ml आढळले. सामान्यत: हे प्रमाण २०० ng/ml असे आढळते. मात्र इंद्राणीच्या युरिनच्या नमुन्यात हे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्याचमुळे तिने ड्रग्ज ओव्हरडोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असे या अहवालात म्हटले आहे. एवढेच नाही तर हिंदुजा रूग्णालयाने भायखळा तुरुंग प्रशासनाला काही प्रश्नही विचारले आहेत.
नेमके या प्रश्न विचारण्यात आले आहेत?
इंद्राणी मुखर्जीला antianxiety औषधे लिहून देण्यात आलेली नाहीत, मग तिला ती कशी काय मिळाली?
इंद्राणी मुखर्जीला एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधे कशी काय मिळाली?
इंद्राणी मुखर्जीला कोणती औषधे दिली जात आहेत हे तुरुंगातील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासली नव्हती का?
इंद्राणीने ऑक्टोबर २०१५ मध्येही औषधांचा ओव्हरडोस घेतला होता, अशात तिच्यावर व्यवस्थित लक्ष का ठेवण्यात आले नाही?
हिंदुजा रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसर इंद्राणी मुखर्जीने किमान तीन पाकिटे गोळ्या घेतल्या असाव्यात असा अंदाज वर्तवला आहे. इंद्राणी मुखर्जीवर तिच्या मुलीचा अर्थात शीना बोराचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी टीव्ही टायकून पीटर मुखर्जी, इंद्राणीचा घटस्फोटित नवरा संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. तुरुंग प्रशासनाने इंद्राणी मुखर्जीला एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधे कशी उपलब्ध झाली याची चौकशी करावी असेही हिंदुजा रूग्णालयाने म्हटले आहे.
