धायरी येथील पार्क व्ह्यु बांधकाम साइटवर फ्लॅट पाहण्यासाठी पतीसोबत आलेल्या महिलचे सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजरवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानसी विशाल दाभाडे (२८, रा. पौड फाटा, कोथरूड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नीलेश प्रकाश जोशी (३८, रा. रघुकुल नगरी, औंध रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील चव्हाणनगर भागात पार्क व्ह्यू या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मानसी यांच्या पतीने फ्लॅट बुक केला आहे. आरोपी नीलेश जोशी पार्क व्ह्यू इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. मानसी यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. चार मार्च रोजी मानसी त्यांच्या पतीसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी ‘पार्क व्ह्यू’मध्ये बुक केलेला फ्लॅट पाहिला. फ्लॅट पाहिलेल्या इमारतीच्या शेजारी आणखी एका इमारतीचे काम सुरू होते. चार मार्च रोजी रविवार असल्यामुळे काम बंद होते. काम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मानसी या गेल्या. सहाव्या मजल्यावरून खाली पाहत असताना त्यांचा आचानक तोल गेल्यामुले त्या खाली पडल्या. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी पार्क व्ह्यू या बिल्डिंगच्या बांधकामासंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी नीलेश यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करीत आहेत. मानसी यांना तीन महिन्याचे बाळ असल्यामुळे या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.