नावात काय ठेवलंय असं शेक्सपिअर म्हणाला होता. पण तसं पहायला गेलं तर नावातच सगळं आहे. प्रत्येकाची आयुष्यात नाव कमावण्यासाठी धडपड सुरु असते. आपल्याला लोकांना आपल्या नावाने ओळखावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण गुजरातमधील एका रिक्षाचालकाला आपलं नाव बदलून RV155677820 असं ठेवायचं आहे. राजवीर उपाध्याय असं नाव असलेल्या रिक्षाचालकाने नाव बदलण्यासाठी सरकारकडे रितसर अर्ज केला आहे. सरकारने मात्र कोणतंही कारण न देता अर्ज नामंजूर केला आहे.
राजवीर हा नास्तिक आहे. २०१५ त्याने धर्माचा त्याग केला. आपलं नाव आणि आडनाव आपला जात, धर्म सांगतो, त्यामुळे आपल्याला नाव बदलायचं आहे असं राजवीरचं म्हणणं आहे. म्हणूनच राजवीरने असं नाव निवडलं आहे, ज्यामधून त्याचा धर्म किंवा जात कोणालाही कळणार नाही. राजवीरची इच्छा आहे की लोकांनी त्यांना RV155677820 नावाने हाक मारावी, ज्यामधीसल RV हा त्याच्या राजवीर नावाचा शॉर्टफॉर्म असून 155677820 हा त्याच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरील नावनोंदणी क्रमांक आहे.
राजवीरने गतवर्षी अहमदाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देत नाव बदलण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिका-यांनी राजवीरला गॅजेट्स कार्यालयात अर्ज करायला सांगितलं. पण त्याचा अर्ज नाकारण्यात आला. आता राजवीर गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. गुजरातमध्ये धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गंत कोणत्याही व्यक्तीला धर्मातर करण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र नास्तिक लोकांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
राजवीर उपाध्याय यांचं म्हणणं आहे की, ‘मी एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे आणि भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. देशाच्या कायद्याने मला नास्तिक होण्याचाही अधिकार दिला पाहिजे. जेव्हा कधी मी माझं नाव सांगतो तेव्हा लोकांना माझा कोणता धर्म आहे, जात काय आहे सगळं माहिती पडतं. माझी ओळख एखाद्या समाजापुरती मर्यादित रहावी अशी माझी इच्छा नाही’. आपण लवकरच उच्च न्यायालयात अर्ज करुन, नास्तिकतेला निवडण्याचं आणि नाव बदलण्याची मागणी करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.