धसई धरणाला मोठी गळती

उन्हाळ्याच्या या दिवसात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना मुरबाड तालुक्यातील धसई गावाजवळील धरणाच्या भिंतीलगत असणाऱ्या विहिरीचा काही भाग खचल्याने लाखो लिटर पाणी गेल्या तीन-चार दिवसांपासून वाया जात आहे. विहिरीला मोठे भगदाड पडल्याने ही आपत्ती ओढवली आहे. अशीच गळती होत राहिली तर तीन-चार दिवसांत धरण रिकामे होऊन परिसरात भीषण पाणीटंचाई भेडसाविण्याची शक्यता आहे.

धसई गावाजवळ लघुपाटबंधारे खात्याचे धरण असून तेथील पाणी मुख्यत: सिंचनासाठी वापरले जाते. धरणातील पाण्याच्या आधारे पावसाळ्यानंतर शेतकरी कडधान्य तसेच भाजीपाला पिकवितात. यंदा तर मुबलक पाऊस पडल्याने धरण तुडुंब भरलेले आहे. मात्र विहिरीचा काही भाग खचल्याने गेल्या तीन दिवसांपासून धरणातील पाण्याचा फार मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या पाण्याच्या आधारे भाजीपाला पिकविणारे शेतकरी चिंतेत आहेत. धरणातील पाणी असेच वाया जात राहिले तर आणखी चार-पाच दिवसांत धरण कोरडे पडेल, अशी भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. उन्हाळ्याचे चार महिने अद्याप बाकी आहेत. धरणाने तळ गाठला तर  भाजीपाला वाया जाईलच, पण येथील पंचक्रोशीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.  कारण धरणातील या बारमाही जलसाठय़ामुळे परिसरातील विहिरींनाही पाणी असते. त्या विहिरी आटल्या तर पुढचे चार महिने काढायचे कसे असा सवाल धसईकर विचारीत आहेत. शासनाने तातडीने विहिरीची दुरुस्ती करून धरणातील पाणी गळती थांबवावी, असे आवाहन  ग्रामस्थ विलास सुरोसे यांनी केले.

विहिरीचा काही भाग खचल्याने धसई धरणातून पाणी गळती सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाला कळविले आहे. लवकरात लवकर गळती थांबविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *