एकीकडे शहरी तसेच ग्रामीण भागांतील पालकांचाही आपल्या पाल्यांसाठी इंग्रजी भाषेकडे ओढा वाढत असताना देशातील ४२ भाषा, बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या दहा हजारहून कमी लोक या भाषा बोलत असल्याने त्या लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामध्ये बुलडाण्यातील निहाली या भाषेचाही समावेश आहे.
जनगणना संचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार देशात २२ भाषा अधिकृत असून, १०० भाषा अधिकृत नसल्या तरी त्या एक लाख किंवा अधिक नागरिकांकडून बोलल्या जातात; परंतु देशातील ४२ भाषा दहा हजारांपेक्षाही कमी लोक बोलतात. या भाषा धोक्यात आल्या असून, लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात २२ अधिकृत भाषांव्यतिरिक्त काही राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणखी ३१ भाषांना आपापल्या प्रदेशांत अधिकृत भाषांचा दर्जा दिला आहे. जनगणनेच्या अहवालानुसार १,६३५ भाषा शास्त्रीयदृष्ट्या मातृभाषा आहेत, २३४ मातृभाषा आहेत आणि २२ भाषा या देशातील महत्त्वाच्या भाषा आहेत.
