किल्ले माहुली या ऐतिहासिक शिवकालीन गडाच्या पायथ्याशी जनक्रांती संघटनेतर्फे दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. या ऐतिहासिक भूमीला मुजरा करण्यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे वंशज हजेरी लावतात. यावर्षी १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीसाठी अफझलखान वधाच्या लढाईत अफझलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात कलम करून छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचवणारा व पुढे इतिहासात ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही बिरुदावली लागलेला शिवरक्षक जीवाजी महाला यांचे थेट वंशज संतोष राजे महाले यांना निमंत्रित केले आहे.
आतापर्यंत किल्ले माहुलीच्या पायथ्याशी साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई सरसेनापती हरजीराजे महाडिक यांचे वंशज विजयसिंहराजे महाडिक, सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांचे थेट वंशज शिवाजी राजेजाधव यांनी या भूमीत येऊन वंदन केले आहे.
किल्ले माहुलीवर अनेक शिवभक्त, मावळ्यांचे वंशज येथे येऊन नतमस्तक होत असले तरी आजपर्यंत तीन वर्षांत सरकारचा एकही प्रतिनिधी, मंत्री येथे फिरकलेला नाही, अशी खंत येथील अनेक शिवप्रेमी व्यक्त करीत आहेत. येथे जाणारा रस्तादेखील नादुरस्त आहे. या गडाच्या पायथ्याशी जिजाऊ व बाल शिवबा यांचा एकत्रित पुतळा असलेली शिवसृष्टी उभारावी, अशी जनक्रांती संघटना व मावळ्यांच्या वंशजांची मागणी आहे, परंतु अजूनही सरकारची पावले या भूमीकडे वळत नसल्याची खंत किल्ले माहुली शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष लक्ष्मण घरत व द्वारकानाथ जाधव यांनी व्यक्त केली आहे.
