पुणे येथून गणपतीपुळेला देवदर्शनासाठी जात असताना आंब्याजवळील अपघाती वळणावरील झाडावर कार धडकून झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले. मृतांमध्ये दोन मुले, पाच पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. सकाळी १०.३० ला तळवडे वळणावर हा अपघात झाला. संतोषकुमार त्रिंबक राऊत (४५), स्नेहल ऊर्फ अपर्णा संतोष राऊत (३२), स्वानंद संतोष राऊत (५) रा.शेवाळेवाडी हडपसर पुणे,दीपक बुधाजी शेळकंदे(४०), वरूण दीपक शेळकंदे (२), साई पार्क,लक्ष्मी सुपर मार्केट,दिघी पुणे, चालक प्रशांत सदाशिव पाटणकर(४० ), रा.भागीरथी हौस पिंपळेगुरव,पुणे, अशी मृतांची नावे आहेत.
जखमींमध्ये वरुणा दीपक शेळकंदे (३८),यज्ञा दीपक शेळकंदे (३ ) यांचा समावेश आहे. अपघाताची भीषणता एवढी होती की कारचा पुढील भाग चक्काचूर होऊन, पुढील बाजूला एअरबॅग होत्या, पण जोरदार धडकेने फुटून गेल्या, त्याचा फायदा झाला नाही.कारचे इंजिन मागील सीटपर्यंत चेपत गेले होते.झाडाला ठोकरून गाडी उलट्या दिशेने फिरली.मागील सीटखाली रक्ताचा सडा पडला होता.गाडीचा दरवाजा मोडून दोघे बाहेर फेकले होते.वरुणचे टोपरे व दुधाची बाटली रक्ताच्या सड्यात लालभडक झाली होती.अपघात ठिकाणचे चित्र मन सुन्न करणारे होते.जखमींना स्थानिक अपघात मदत पथकाच्या कार्यकर्त्यांनी तातडीची मदत पुरवून अर्ध्या तासात १०८ सेवेने मलकापूर ग्रामीणमध्ये उपचारार्थ दाखल केले.
अधिक वृत असे की,पुणे येथील सेनापती बापटमधील यार्डी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लि.कंपनीत हे तिघे मित्र नोकरीस होते.पाटणकर हे प्रमुख अधिकारी होते. राऊत व शेळकंदे सीएसआर म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करीत होते. हे तिघे पाटणकर यांच्या कारने पहाटे गणपतीपुळे येथे जाण्यास निघाले. लहान तीन मुलांसह आठजण गाडीत होते.सलग तीन दिवसाच्या सुटीच्या कोकण सहलीवर जात होते.मलकापूरनंतर आंब्याजवळ येत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने वेगवान गाडी महामार्गाच्या डाव्या बाजूवरील आंब्याच्या झाडावर ठोकरली.या दुर्दैवी अपघातात तिघे जागीच तर दोन बालके मलकापूर रुग्णालयात तर चालक पाटणकर कोल्हापूर सीपीआरमध्ये उपचार चालू असताना मृत्युमूखी पडला. वरुणा व यज्ञा यांच्यावर सीपीआरला उपचार चालू आहेत.
येथील अपघात मदत पथकातील कार्यकर्ते कृष्णा दळवी,नीलेश कामेरकर,गणेश शेलार,मारुती पाटील,दत्ता गोमाडे,लक्ष्मण घावरे,राजेंद्र लाड,महेंद्र वायकूळ,शंकर डाकरे यांची मदत झाली.शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांनी अपघातास्थळी पोहोचून महामार्ग वाहतुकीस खुला केला. डीवायएसपी आर.आर.पाटील,एस.पी.संजय मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली.प्रजासत्ताक दिनाला जोडून विकली सुटी असल्याने कोकणकडे जाणारे मोठे दळणवळण चालू होते. अपघाताची भीषणता पाहून वाहनधारकांमध्ये धडकी भरत होती.
