वातानुकूलन यंत्राच्या स्फोटात एकाचा मृत्यू

ठाण्यातील चितळसर भागातील सिद्धांचल क्लब जवळ असलेल्या व्यायामशाळेच्या एसीमधील बिघाड दुरुस्त करत असताना यंत्राच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सागीर अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. गोलू चौधरी (१९), अवनिश मौर्या (२४) आणि अंकित सिंग (२०) अशी अन्य जखमींची नावे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या सिद्धांचल क्लबजवळ द जीम ही अजित जाधव यांच्या मालकीची व्यायामशाळा आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जीमच्या वातानुकूलन यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांनी नाहूर येथील इलेक्ट्रिशनला बोलावले होते. त्यांच्याकडून या एसीच्या कॉम्प्रेसरची पाहणी करण्यात येत असताना या यंत्राचा स्फोट झाला. यावेळी तेथे असलेले चारही जण खाली फेकले गेले. यापैकी सागीर अन्सारी या स्फोटामुळे गंभीर भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तर अन्य तिघे जखमी असून त्यांना उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *