ओल्ड मंक’ला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या कपिल मोहन यांनी ६ जानेवारी रोजी गाझियाबाद येथे अंतिम श्वास घेतला. गाझियाबाद येथील मोहन नगर येथे ते राहत. उद्योग व्यवसायातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना वर्ष २०१० मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी पुष्पा मोहन आहेत. वडील एन एन मोहन आणि भाऊ व्ही आर मोहन यांचा वारसा पुढे नेणाऱ्या कपिल मोहन यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
कपिल मोहन हे १९६५ च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि.चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता. कपिल मोहन यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर ओल्ड मंक रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने तीन नवे डिस्टिलरी आणि दोन ब्रेव्हरेज सुरू करण्याशिवाय देशातील विविध भागात फ्रँचायजींचा विस्तार ही केला होता. मोहन यांनी नंतर ग्लास, ब्रेकफास्ट फुड, ज्यूस आणि अभियांत्रिकी उद्योगातही पाऊल ठेवले होते. विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या मोहन यांच्यामुळे मीकिन लि.ची सध्याची उलाढाल ही ४०० कोटी रूपयांहून अधिक आहे.
एडवर्ड डायरने वर्ष १८५५ मध्ये कसौली येथे ब्रेव्हरी सुरू केली होती. काही वर्षांनंतर एचजी मीकिन यांनी मीकिन अँड कं. लि.ची स्थापना केली होती. त्यांनी सिमला आणि कसौली येथील ब्रेव्हरीज सुरू केले हेाते. त्याशिवाय डलहौसी, रानीखेत, चकराता, दार्जिलिंग आणि किर्की येथे नवीन प्लांटही स्थापित केले होते. नंतर दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत लिया आणि डायर मीकिन अँड. कंपनी लि. सुरू केली. वर्ष १९३५ मध्ये भारतापासून ब्रह्मदेश वेगळे झाल्यानंतर भारतातील कंपनीचे नाव डायर मीकिन ब्रेव्हरीज करण्यात आले होते. त्यानंतर वर्ष १९६६ मध्ये कंपनीचे मोहन मीकिन ब्रेव्हरीज लि. असे नामांतर करण्यात आले होते. त्यानंतर १९८० मध्ये कंपनीचे नाव पुन्हा बदलण्यात आले आणि मोहन मीकिन लि. नावानेच ती ओळखली जाऊ लागली.
