रात्री मुलीच्या खोलीत प्रियकर; वादात पित्याचा मृत्यू

रात्री मुलीच्या खोलीत तिचा प्रियकर दिसल्यानंतर झालेल्या वादात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जिन्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशमधील नोएडाजवळील अट्टा गावात विश्वनाथ साहू आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. रविवारी पहाटे विश्वनाथ साहू यांना जाग आली. मुलीच्या खोलीतून आवाज आल्याने ते तिथे गेले. मात्र खोलीत मुलीला आणि तिच्या प्रियकराला बघून त्यांचा पारा चढला. साहू यांची मुलगी पुजाचे (२१) परिसरातच राहणाऱ्या धर्मेंद्र (२४) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. साहू यांनी धर्मेंद्रला घरातून जायला सांगितले आणि पुजाला ओरडू लागले. यादरम्यान पुजा व तिचा प्रियकर धर्मेंद्र या दोघांनी विश्वनाथ साहू यांना उलट उत्तरे दिली. वाद चिघळला आणि प्रकरण बाचाबाचीपर्यंत पोहोचले. याच दरम्यान विश्वनाथ साहू यांचा तोल गेला आणि ते जिन्यावरुन खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने विश्वनाथ साहू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सुरु असताना त्यांची पत्नी गायत्री देखील तिथेच होती.

गायत्री यांनी मुलगी पुजा आणि तिचा प्रियकर धर्मेंद्र या दोघांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पुजाला अटक केली असली तरी तिचा प्रियकर धर्मेंद्र आता फरार आहे. वडिलांच्या मृत्यूचे पुजाला दुःखच नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. पुजाने शालेय शिक्षणही अर्धवट सोडले होते. तिचे वडील विश्वनाथ साहू हे खासगी कंपनीत कामाला होते. गेल्या वर्षभरापासून पुजाचे धर्मेंद्रशी प्रेमसंबंध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *