ठाण्यात महाराष्ट्र बंद आंदोलनाचा जोर; विरोधकांकडून भीमा कोरेगाव हिंसाचारावर संसदेत चर्चेची मागणी

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती.  सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर या शहरांत दगडफेक, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले.

पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. शहरात सर्वात जास्त तणाव चेंबूर आणि घाटकोपरमध्ये होता. या भ्याड हल्ल्यामागे असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंसह अन्य आरोपींविरोधात गुन्हा नोंद होत नाही, त्यांना अटक होत नाही तोवर रस्ता मोकळा करणार नाही, अशी भूमिका घाटकोपर रमाबाई नगर, कामराज नगरातील आंबेडकरी जनतेने घेतली होती. अशाच प्रकारचा रास्तारोको विक्रोळीच्या कन्नमवार नगरात करण्यात आला. चेंबूरमधील आंदोलकांनी चेंबूर नाका येथे सायन-पनवेल मार्ग रोखून धरला. पवईत आयआयटी संकुलासमोर चक्का जाम करण्यात आला. गोवंडी, चेंबूर रेल्वे स्थानकांमध्ये लोकल रोखण्यात आल्या. शहरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, पवई या भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांच्या टायरमधील हवा काढण्यात आली.

तर पुण्यासह नाशिक, नागपूर, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ यासह विदर्भातील अनेक भागांमध्ये बसेसे आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांना पांगविण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला. दरम्यान, कोरेगाव भीमा येथील घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.तर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी कोरेगाव भीमा परिसरात भेट दिली आणि दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. इंटरनेटच्या मदतीने अफवा पसरण्याची शक्यता लक्षात घेता हवेली आणि शिरूर तालुक्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातही वादग्रस्त मजकूर पसरविणाऱ्या काही साइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

लाईव्ह अपडेटस्

*नालासोपारा इथे सकाळी दहाच्या सुरामास लोकल वाहतूक अडवण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
*विरार पाठोपाठ गोरेगाव इथे लोकल गाडी अडवत आंदोलन करण्यात आले, मात्र सध्या वाहतूक सुरळीत
*रायगड, खोपोली, माणगाव आणि पेणमध्ये बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *