न्यू इयर पार्टीचे बेत आखणा-या तळीरामांसाठी एक वाईट बातमी आहे. राज्य सरकारने बिअरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मद्यपींना 31 डिसेंबरच्या रात्री बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 650 एमएलच्या एका बिअरच्या बाटलीवर 35 ते 40 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव होता. पण सरकारने थेट इतकी वाढ न करता 15 ते 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात वार्षिक 33 कोटी लिटर बिअरची विक्री होते. मागच्या वर्षी उत्पादन शुल्क विभागाने 12,288 कोटींचा महसूल मिळवला. यावर्षी 14 हजार कोटींचे लक्ष्य आहे. वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क कर आकारला जात नाही. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये देशात वाईन उद्योगाचे मुख्य केंद्र आहे. वाईनमध्ये करात जे नुकसान होते ते बिअरमधून भरुन काढले जाते अशी माहिती सूत्रांनी दिली. वाईन उद्योगात महाराष्ट्राचा वाटा 80 टक्के असून त्याखालोखाल कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि अन्य राज्यांचा क्रमांक येतो.
