ओखी चक्रीवादळ शमले, आजही पावसाची शक्यता

केरळ, तामिळनाडूनंतर गुजरातच्या दिशेने सरकणारे ओखी चक्रीवादळ गुजरातला पोहोचण्यापूर्वीच शमले आहे. त्यामुळे गुजरातला दिलासा मिळाला असला तरी बुधवारी देखील मुंबई व कोकण किनारपट्टी तसेच गुजरातमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या आठवडाभरापासून ओखी चक्रीवादळाने केरळ, तामिळनाडू व लक्षद्वीप भागात थैमान घातले होते. यानंतर हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने सरकत होते. सोमवारी संध्याकाळपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी देखील मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळ गुजरातच्या दिशेने सरकताच महाराष्ट्रावरील प्रभाव कमी झाला. मंगळवारी संध्याकाळनंतर धास्तीचे ढग विरत गेले आणि मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गुजरातमधील सुरतजवळ हे वादळ स्थिरावणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र स्कायमेटने हे वादळ सुरतला पोहोचण्यापूर्वीच शमल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट केले. या वादळाचा आता गुजरातला कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले. मात्र, ओखी वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातमध्ये पुढील दोन दिवस पाऊस हजेरी लावणार, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

बुधवारी सकाळपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी सिंधुदुर्ग आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याचे समजते. ओखी वादळामुळे केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळात ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार अद्याप बेपत्ताच आहेत. ओखी वादळाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला असून कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत आहेत. तर द्राक्ष व कांद्याचे पीकही धोक्यात आले आहे.

ओखी चक्रीवादळाचा प्रवास
प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या ‘किरोगी’ चक्रीवादळातून अवशेष म्हणून राहिलेली ऊर्जा २० नोव्हेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरली. २९ नोव्हेंबरला श्रीलंकेच्या आग्नेय दिशेला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) निर्माण होऊन त्याने वायव्येकडे आपला प्रवास सुरु केला. याच काळात त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळाचे रूप धारण केले. अरबी समुद्रात प्रवेश केलेल्या या चक्रीवादळाचे नामकरण बांग्लादेशाने ‘ओखी’ असे केले असून, त्याचा अर्थ डोळा असा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *