देशातील महानगरांबरोबरच परदेशातूनही मागणी
आजचे युग ‘मार्केटिंग’ अन् ‘ब्रँडिंग’चे आहे. हे गणित जमले की त्या वस्तूला चांगली बाजारपेठ मिळते. मांसाहार करणाऱ्यांमध्ये अलीकडच्या काळात ‘कडकनाथ’ या नावाने प्रसिद्ध असलेली कोंबडी अशीच लोकप्रिय ठरली आहे. आदिवासींमधील भिल्ल जमातीतील नागरिकांची अनादी काळापासून जिव्हातृप्ती करणाऱ्या ‘कडकनाथ’चे भाव सध्या गगनाला तर भिडले आहेतच; पण देशातील महानगरेच नव्हे तर विदेशातून त्यांना मागणी वाढली आहे. खवय्यांकडून होणाऱ्या प्रचंड मागणीमुळे त्याचे दर्शन दुर्मीळ होऊ लागले आहे.
काळ्या रंगाची पिसे, चोच, जीभ, बोटे आणि एवढेच नव्हे तर ‘कडकनाथ’चे (कोंबडी) रक्त आणि मांसही काळ्या रंगाचे असते. काळा रंग तसा अशुभ, पण ‘कडकनाथ’बाबत हे लागू होत नाही. त्याची लोकप्रियता आणि औषध गुणांमुळे ‘कडकनाथ’ पालनाचा व्यवसाय तेजीत आहे. पंचतारांकित हॉटेलमध्येही ‘कडकनाथ’ला चांगली मागणी असून, अतिशय चढय़ा दराने त्याची मांसविक्री केली जाते. आता तर परदेशातही मागणी वाढू लागली आहे. सध्या यात महिला बचतगटाने उडी घेत या व्यावसायिक संधीचे सोने केले आहे.
कडकनाथचा पूर्व इतिहासही गमतीदार आहे. नागपुरातील पशुसंवर्धन खात्याने २००७ पासून कडकनाथची पिल्ले आणि अंडी उत्पादन सुरू केले. त्याचा योग्य प्रचार आणि प्रसार झाल्याने मागणी वाढू लागली. आता खरेदीसाठी आगाऊ नोंदणी केली जाते. सद्य:स्थितीत पुढील वर्षांच्या मार्च महिन्यापर्यंत नोंदणी झाली आहे. या कडकनाथ कोंबडीचे नशीबही इतके थोर की अवघ्या एक दिवसाचे पिल्लू ४० रुपयांना विकले जाते. दर आठवडय़ाला दीड ते दोन हजार पिल्ले विकली जातात. महिला बचतगट तसेच खासगी व्यावसायिक येथून पिल्ले विकत घेतात, असे पशुसंवर्धन खात्याच्या सहायक आयुक्त मृणालिनी साखरे यांनी सांगितले.
