वसईतील ख्रिस्तायण : विवाह सोहळे

दोन व्यक्तींना एकत्र जीवन व्यतीत करण्यासाठी कायदा आणि समाजाने दिलेली सामाजिक मान्यता म्हणजेच विवाह होय. जगभरात विवाहास संस्कार असे मानण्यात आलेले आहे. संपूर्ण विश्वात विवाहाची संकल्पना सारखी असली तरी विवाह समारंभ किंवा सोहळे हे वेगवेगळे असतात. हे स्थानिक पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात.

वसईतील ख्रिस्ती समाजात सामवेदी (कुपारी), सोमवंशी (वाडवळ), ईस्ट इंडियन आणि कोळी व इतर मच्छीमार या समाजपरत्वे चार प्रकारचे विवाह सोहळे पार पाडले जातात. विवाहाचे मुख्य विधी सारखेच असले तरी पद्धती आणि पंरपरा वेगवेगळ्या असतात.

सर्वप्रथम, उपवर आणि वधुच्या बाप्तिस्मा प्रमाणपत्राची चाचपणी केली जाते. त्यावरून त्यांचे वय, आई-वडील आणि कुटुंबाची माहिती तसेच यापूर्वी विवाह केलेला आहे किंवा नाही इत्यादी गोष्टी समजतात. मग सहा महिन्यांपूर्वी चर्चमध्ये एक विवाहपूर्व फॉर्म भरण्यात येतो. त्याचबरोबर बायबलवर हात ठेवून शपथविधी केला जातो. त्यात काही सर्वसाधारण प्रश्न विचारले जातात. जसे की, तू खरेच लग्न करण्यास तयार आहेस की, तुला कोणी जबरदस्तीने उभे केलेले आहे? तू या व्यक्तीला न घाबरता, कोणत्याही दहशतीखाली न राहता स्वखुशीने लग्नास तयार आहेस का? याचबरोबर स्वत:च्या लेकरांचा स्वीकार करणार का? तू या व्यक्तीसोबत सुख-दु:खात, आजारपणात साथ देशील का? नैसर्गिक कुटुंब नियोजन करणार का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे बायबलवर हात ठेवून दिली जातात. तसेच यास वचनबद्ध होणे, असेही म्हणतात, तसेच फॉर्मवरही हो किंवा नाही या स्वरूपात याच प्रश्नांची उत्तरे लिहून घेतली जातात आणि त्यावर दोघांची स्वाक्षरी घेतली जाते.

मग त्यानंतर त्या व्यक्तीच्या गावी तसेच इतर ज्या ठिकाणी ती व्यक्ती वास्तव्यास होती, त्या सर्व ठिकाणच्या चर्चमध्ये लग्नापूर्वी एक महिना घोषणा केली जाते की, येथे राहणारी मुलगी किंवा मुलगा यांचे अमुक एका व्यक्तीशी या तारखेला लग्न ठरलेले आहे, तर कोणाला काही हरकत असल्यास ती चर्चच्या प्रमुखांकडे नोंदवावी, अशी घोषणा सर्व भागांत करण्यात येते.

या घोषणेच्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी जवळचे नातेवाईक, पाहुणे विवाह ठरल्याचा आनंद व्यक्त करण्यासासाठी येतात, एकत्र स्नेहभोजन केले जाते. मग त्या दिवसापासून लग्नाची पत्रिका छापली असो किंवा नसो उपवर आणि वधूच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मुभा मिळालेली असते. त्यावेळी वधूची आणि वराची आई आपल्या माहेरी किंवा आपल्या भावाकडे जातात. मग तिला साडी नेसवली जाते. त्या दिवसापासून तिला ‘वधुमाई’ वा ‘वरमाई’ असे संबोधतात. सर्वप्रथम तिला लग्नाचे आमंत्रण देण्याचा पूर्ण अधिकार असतो.

अनेक हौशी लोक सहा, चार, दोन किंवा एक महिना आधीपासून रोज किंवा वेळ मिळेल तसा घरासमोरील अंगणात जल्लोष करतात. अंगणातील झोपाळ्यावर बसून गाणी म्हणतात. काही लोक घुमटावर ताल धरत गाणी म्हणतात, नृत्य सादर करतात. म्हणजे गावातील लोकांना समजते यांच्या घरी ‘यंदा कर्तव्य आहे.’ लग्नाच्या दोन दिवस आधीपासून बँड वाजवला जातो. वधू किंवा वराच्या मामा-मामीला लग्नास बोलावण्यासाठी, धर्म माता-पिता (नामकरण विधीच्यावेळी आई-वडील दोन व्यक्तींना त्या बालकाचे धर्म माता-पिता म्हणून निवडतात. जर आई-वडील नसल्यास हे धर्म माता-पिता त्यांचा विधी करतात. हे माता-पिता कोणीही जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकांमधील असतात.) बोलावण्यासाठी, वधू किंवा वराला चर्चमध्ये घेऊन जाताना तसेच आणखी काही जवळच्या नातेवाईकांना लग्नात सामील व्हायचे आमंत्रण देण्यासाठी हा बँड पाठवला जातो. प्रत्येक समाजपरत्वे त्यांच्या विधीनुसार बँडचा वापर केला जातो.

लग्नाच्या आदल्या दिवशी वधू आणि वर मिसा विधीसाठी चर्चमध्ये जातात, तसेच ते पाप निवेदन संस्काराचा स्वीकारत करतात. त्यावेळी ते आपल्या चुकांचा प्रामाणिकपणे स्वीकार करतात, पश्चत्ताप व्यक्त करतात. मग पवित्र मनाने ते लग्नविधीस तयार होतात. चर्चमध्ये उपवर आणि वधूला लग्नविषयक, भावी जीवनाबद्दल, बदलणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देतात आणि त्यांची मानसिक तयारी करून घेतात, जेणेकरून त्यांच्या भावी आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

फादर फ्रान्सिस कोरिया सांगतात, वसईत साधारण नोव्हेंबर ते मे या दरम्यान विवाह केले जातात. पूर्वी लग्नासाठी सोमवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवसांना लोकांकडून पसंती दिली जात होती. मात्र आता नोकरी-व्यावसाय सांभाळून, प्रत्येकाच्या सोयीने शुक्रवार, शनिवार आणि राविवार असे सोयीनुसार दिवस निवडले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *