अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात माकडाचं ध्यान!

भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात दररोज हजारो भाविक येऊन दर्शन घेतात. कुठल्याही दिवशी या मंदिरात भाविकांची तितकीच वर्दळ पाहायला मिळते. विशेषकरून गुरूवारी तेथे नित्यनियमाने भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असतात. पण हा गुरूवार अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसाठी खास ठरला. कारण या गुरूवारी भाविकांना स्वामींच्या मंदिरात चक्क माकडाचं ध्यान पहायला मिळालं. गुरूवारी सकाळी गर्दीच्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला लोकांना माकडाचं दर्शन झालं. मंदिरात हे माकड आलं कसं असा प्रश्नही अनेकांना पडलं. मंदिराच्या दाराजवळ हे माकड तब्बल 10 मिनीटं बसून ध्यान करत होतं. दोन्ही हात मंदिराच्या प्रवेश दाराच्या उंबरठ्यावर ठेवून डोळे बंद करून ते बसलं होतं. मंदिरात अचानक आलेल्या माकडाला पाहून तेथिल काही भाविकांनी त्याच्या बाजूला खाण्यासाठी दाणे ठेवले पण माकड चिंतनात इतकं व्यस्त होतं की त्याने आजूबाजूला पाहिलंही नाही. स्वामींच्या गाभाऱ्यात सुरू असलेली पूजा त्या माकडाने दरवाजात बसून पाहिली. या सगळ्या घटनेचं मोबाइलमध्ये चित्रिकरण झालं आहे.

मंदिरातील चिंतन झाल्यानंतर या माकडाने आपली स्वारी मंदिराबाहेर वळविली. मंदिराच्या बाहेर असलेल्या दगडावर बसून त्याने भाविकांना आशिर्वाद द्यायला सुरूवात केली. माकडाला दगडावर बसलेलं पाहून अनेक भाविक दाणे किंवा फळ घेऊन त्याच्या जवळ येत होते. आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर त्या माकडाने हात फिरवला.  गुरूवारी स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच हनुमानाचंही दर्शन झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केली आहे. बऱ्याचदा माकड किंवा कुठलाही प्राणी अचानक समोर आला तर लोक बिचकतात अन्यथा त्या प्राण्यापासून लांब जातात. पण अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या मंदिरात असं झालं नाही. तेथिल लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळेच न घाबरता माकडासमोर जात होते आणि आशिर्वाद घेत होते.

सोलापूरपासून 38 किलोमीटर अंतरावर असलेलं अक्कलकोट हे देशभरातील स्वामी समर्थ भक्तांचं महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 19 व्या शतकातील वटवृक्ष महाराजांची समाधी हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोट मंदिरात मोठा उत्सव पहायला मिळतो. येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामीभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. हा उत्सव पाहण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात हजर असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *