देशातील दुस-या क्रमांकाची विमान कंपनी जेट एअरवेजने आपल्या ज्युनिअर वैमानिकांना 30 ते 50 टक्के पगारकपातीसाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. जेट एअरवेजचं म्हणणं आहे की, ज्युनिअर वैमानिकांनी पगारकपातीसाठी तयार राहावं अन्यथा ते राजीनामा देऊ शकतात. संपुर्ण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं आणि सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्चात कपात करण्याच्या हेतूने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला वैमानिकांना पाठवण्यात आलेल्या पत्रात जेट एअरवेजने सांगितलं आहे की, स्टायपेंड किंवा पगारकपातीसाठी तुम्ही सर्वजण तयार व्हा. ‘आपल्या उड्डाणांचा वेग वाढवण्यासाठी आणि नेटवर्क अजून मजबूत व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’, अशी माहिती जेट एअरवेजकडून देण्यात आली आहे.
आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीखाली या प्रकरणाशी संबंधित दोन व्यक्तींना माहिती दिली आहे की, 1 ऑगस्टपासून जेट एअरवेज निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करणार आहे. जेट एअरवेजच्या जवळपास 400 वैमानिकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अजून एका सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजला वैमानिकांसोबत कामाच्या बाबतीत जुळवून घ्यावं लागणार आहे. याशिवाय आखात देशांमधील आपलं नेटवर्क मजबूत करण्यासाठी आणि विमानांची संख्या वाढवण्यासाठी जेट एअरवेजचे प्रयत्न सुरु आहेत.
खासगी विमान कंपन्यांमध्ये सर्वात जास्त कॉस्ट स्ट्रक्चर असणा-या जेट एअरवेजने सध्या याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. इंडिगो आणि स्पाईसजेटसारख्या स्वस्त विमान सेवा पुरवणा-या कंपन्यांसोबत स्पर्धा करत असलेल्या जेट एअरवेजला गेल्या काही महिन्यांपासून वारंवार पिछाडीवर राहावं लागलं आहे. संयुक्त अरब अमिराती येथील एतिहाद एअरवेजच्या मालकीची असलेली ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीवर फरक पडल्याने महसूल संकटाचा सामना करत आहे.
