२ वर्षांपूर्वी हिंदू मुलीशी लग्न केलेल्या मुस्लिम तरुणाची मुलाच्या वाढदिवशीच हत्या

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर. २०१३ मध्ये येथे जातीय हिंसाचाराच्या भडक्यात अनेक लोक होरपळले होते. जवळपास ५० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच मुजफ्फरनगरमध्ये धक्कादायक अशी घटना घडली आहे. दोनच वर्षांपूर्वी घरच्यांचा विरोध झुगारून एका मुस्लिम तरुणानं हिंदू मुलीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ते विशाखापट्टणममध्ये राहत होते. सुखी संसार सुरु होता. पण काही दिवसांपूर्वीच ते ईद साजरी करण्यासाठी गावात परतले आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या मुस्लिम तरुणाची मुलाच्या वाढदिवशीच निर्घृण हत्या करण्यात आली. नसीम खान असं या तरुणाचं नाव आहे. त्याची पत्नी पिंकी हिच्या माहेरच्या मंडळींनी त्याची हत्या केली, असा आरोप केला जात आहे.

पिंकी आणि नसीम एकाच शाळेत शिकत होते. तेथेच या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. ही बाब पिंकीच्या घरच्या लोकांना समजली. त्यावेळी त्यांनी पिंकीला मारहाण केली. घरच्यांचा विरोध आहे, हे एव्हाना या दोघांनाही समजलं होतं. पिंकीनं घरातून पळ काढला. ती थेट विशाखापट्टणममध्ये नसीमकडे गेली. दोघांनी लग्न केलं. पिंकीनं धर्मांतर केलं आणि नाव बदलून आयेशा ठेवलं. दोन वर्षे ते दोघेही विशाखापट्टणममध्येच राहिले. याचदरम्यान पिंकी आणि नसीमच्या घरच्या मंडळींमध्ये वाद सुरुच होता. पिंकीचे घरचे लोक त्यांना धमक्या देत होते. अखेर त्यांच्यातील वाद संपुष्टात आला. वाद संपुष्टात आल्यानंतर पिंकी आणि नसीमनं यावर्षी आपल्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करण्याचं ठरवलं. त्यांना एक मुलगाही आहे. १७ जुलैला त्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करायचा त्यांचा विचार होता. त्यानुसार हे दोघे आपल्या मुलासह गावी आले. मुलाच्या वाढदिवशी खरेदीसाठी नसीम बाहेर पडला. खरेदीनंतर तो घरी परतत होता. त्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. रस्त्यालगतच्या शेतात मारेकरी दबा धरून बसले होते. नसीम मोटरसायकलवरून येत होता. त्याचवेळी मारेकऱ्यांनी त्याला अडवलं आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांनी नसीमवर गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला. नसीमच्या हत्येनं पिंकीला मोठा धक्का बसला आहे. भाऊ आणि वडिलांनी नसीमची हत्या केली, असा पिंकीचा आरोप आहे. नसीमच्या हत्येनंतर पिंकीनं तिच्या भावालाही फोन केला होता. त्यावेळी तिला आणि मुलाचीही हत्या करण्याची धमकी त्यानं दिल्याचं तिचं म्हणणं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पिंकीचे वडील आणि प्रदीप आणि नीटू या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *