संसदेच्या कॅन्टीनमधील जेवणात सापडला कोळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी संसदेच्या ज्या कॅन्टीनमध्ये जेवण केलं होतं, त्याच कॅन्टीनच्या जेवणात कोळी सापडला आहे. ज्या अधिकाऱ्याला जेवणात कोळी सापडला त्याची प्रकृतीही बिघडली आहे, असं सांगितलं जातं. कमी पैशांत चांगले पदार्थ देणाऱ्या कॅन्टीनच्या व्यवस्थापनावर यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

जेवणात कोळी सापडल्यानं संसदेचं कॅन्टीन वादात सापडलं आहे. लोकसभेतील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मंगळवारी दुपारी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यात कोळी सापडला. लोकसभेतील अधिकारी श्रीनिवासन हे दुपारी कॅन्टीनमध्ये गेले होते. त्यांनी पोंगल आणि दही-भात मागवला. जेवण आल्यानंतर त्यांनी खायला सुरुवात केली. दोन घास खाल्ल्यानंतर त्यांना प्लेटमध्ये कोळी सापडला. त्यानंतर श्रीनिवासन यांची प्रकृती बिघडली. याबाबत त्यांनी कॅण्टीनच्या व्यवस्थापनाकडं तक्रार केली आहे.

दोन वर्षांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कॅन्टीनमध्ये जेवण केलं होतं. आता पंतप्रधान, खासदार, संसदेतील वरिष्ठ अधिकारी या कॅन्टीनमध्ये जेवण करतात. त्यामुळं कॅन्टीन व्यवस्थापनानं दर्जेदार जेवण दिलं पाहिजे, अशी मागणी होत आहे. तर महत्त्वाच्या व्यक्ती या ठिकाणी येऊन जेवण करतात. अशावेळी कॅन्टीन व्यवस्थापनानं आवश्यक ती काळजी घ्यायला नको का, असा सवाल काही जण करत आहेत. दरम्यान श्रीनिवास यांना काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे जेवणात कीडा मिळाला होता. त्यावेळीही तक्रार केली होती. पण कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. संसदेच्या कॅन्टीनमध्ये कमी पैशांत चांगलं जेवण मिळतं. कॅन्टीनच्या जेवणावर अनुदान मिळत असल्यानं दर कमी आहेत. पण या घटनेनंतर कॅन्टीनच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *