नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा मोजण्याचं काम अद्यापही सुरु असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली आहे. उर्जित पटेल संसदीय समितीसमोर हजर झाले होते तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. संसदीय समितीसमोर हजर होण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या नोटांची मोजणी अजूनही सुरु असून नेमक्या किती नोटा पुन्हा परत आल्या आहेत याची माहिती देण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
स्थायी समितीच्या तीन तासांच्या प्रदिर्घ बैठकीत उर्जित पटेल यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, नेमक्या किती नोटा पुन्हा परत आल्या आहेत याची व्यवस्थित माहिती किंवा नंबर उर्जित पटेल यांनी दिला नसल्याचं एका अधिका-याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं आहे.