नागपुरात गोमांस असल्याच्या संशयावरुन मुस्लिमाला मारहाण

गोमांस असल्याच्या संशयावरुन नागपुरात एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. नागपूरमधील भारसिंगीमध्ये हा प्रकार घडला आहे. सलीम इस्माईल शाह असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल (बुधवारी) हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

सलीम इस्माईल मांस विक्रेता असून तो काल त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून मांस घेऊन चालला होता. यावेळी गोमांस असल्याच्या संशयावरुन चार जणांनी सलीम शाह यांना मारहाण केली. या प्रकरणी अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे, मोरेश्वर तांदूळकर आणि जगदीश चौधरी या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सलीम शाह बुधवारी नागपुरात आले होते. त्यावेळी काही जणांना त्यांच्याकडे गोमांस असल्याचा संशय आला. या संशयावरुन अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे, मोरेश्वर तांदूळकर आणि जगदीश चौधरी यांनी सलीम शाह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सलीम यांनी अनेकदा आपल्याकडे गोमांस नसल्याचे सांगितले. मात्र तरीही चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी एकाला काल रात्री तर इतर तिघांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गोमांस असल्याच्या केवळ संशयावरुन जमावाकडून मारहाण केल्या जात असल्याच्या घटना वाढत आहेत. या मारहाणीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्याच महिन्यात जुनैद नावाच्या एका अल्पवयीन मुलाची हरयाणामध्ये हत्या करण्यात आली होती. गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावाने दिल्लीहून बल्लभगडला परतणाऱ्या जुनैदला जबर मारहाण केली होती. या मारहाणीत जुनैदचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या काही दिवसांनंतर झारखंडमधील गिरीदिहमध्ये एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. सुमारे दोनशे लोकांनी मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण करत त्याच्या घराला आग लावली. संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर गाय मृतावस्थेत सापडल्याने जमावाने हे कृत्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *